YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिं. 15:1-32

1 करिं. 15:1-32 IRVMAR

आता बंधूंनो मी तुम्हास आठवण करून देतो, की जे शुभवर्तमान मी तुम्हास गाजवले व जे तुम्ही स्वीकारलेत व ज्याच्यात तुम्ही स्थिरही आहात. ज्याच्या द्वारे तुम्हास तारण मिळाले आहे तेच शुभवर्तमान मी तुम्हास कळवतो. ज्या वचनाने तुम्हासही शुभवर्तमान सांगितले त्या वचनानुसार ते तुम्ही दृढ धरले असल्यास त्याच्या योगे तुमचे तारणही होत आहे; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण जे मला पहिल्यांदा सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले, त्यापैकी महत्त्वाचे हे आहे की, शास्त्रलेखाप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांसाठी मरण पावला. त्यास पुरण्यात आले व शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्यास पुन्हा उठविण्यात आले. व तो केफाला दिसला, नंतर बारा प्रेषितांना, नंतर तो एकाच वेळी पाचशेहून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मरण पावले आहेत. नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला. आणि शेवटी मी जो अवेळी जन्मल्याप्रमाणे, त्या मलासुद्धा तो दिसला. कारण प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणावयाच्या योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला. पण देवाच्या कृपेने मी जो आहे तो मी आहे आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक कष्ट मी केले आहेत, करणारा मी नाही, तर देवाची कृपा जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती. म्हणून मी असो किंवा ते असोत आम्ही अशी घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला. पण जर आम्ही ख्रिस्त मरण पावलेल्यातून उठविला गेला आहे असे शुभवर्तमान गाजवतो, तर मृतांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यातील काहीजण म्हणतात हे कसे? जर मृतांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही, आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही तर आमचा संदेश व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे. आणि आम्ही देवाचे खोटे साक्षी ठरलो कारण देवाने ख्रिस्ताला उठवले अशी आम्ही त्याच्याविषयी साक्ष दिली. जर हे असे असेल की, मरण पावलेले उठवले जात नाहीत तर त्याने त्यास उठवले नाही. आणि जर मृतांना उठवले जात नाही, तर ख्रिस्ताला मरणातून उठविण्यात आले नाही. आणि, जर ख्रिस्त उठविला गेला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि तुम्ही अजून तुमच्या पापात आहात. होय आणि जे ख्रिस्तात मरण पावलेले आहेत, त्यांचाही नाश झाला आहे. जर ख्रिस्तावर असलेली आमची आशाही, फक्त या जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यांपेक्षा आम्ही दयनीय असे आहोत. परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मरण पावलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथमफळ आहे. कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमाणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले. कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील. पण प्रत्येकजण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथमफळ आहे आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले लोक जिवंत केले जातील. मग शेवट होईल, प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल. कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायांखाली ठेवीपर्यंत त्यास राज्य केले पाहिजे. जो शेवटचा शत्रू मृत्यू तो नष्ट केला जाईल. पवित्र शास्त्र सांगते, “कारण देवाने, त्याच्या पायाखाली सर्व गोष्टी अंकित केल्या आहेत.” पण जेव्हा तो म्हणतो की, “सर्व गोष्टी त्याच्या अंकित केल्या आहेत,” तेव्हा ज्याने सर्व गोष्टी त्याच्या अंकित केल्या, तो स्वतः बाहेर आहे हे उघड आहे. आणि, जेव्हा सर्व गोष्टी त्यास वश होतील तेव्हा पुत्र स्वतः त्या सर्व गोष्टी आपल्या वश करणार्‍याला वश होईल. म्हणजे देवपिता हाच सर्वात सर्व असावा. नाही तर, जे लोक मरण पावल्यांसाठी बाप्तिस्मा घेतात ते काय साधतील? जर मरण पावलेले उठविलेच जात नाहीत तर ते लोक त्यांच्याविषयी बाप्तिस्मा का घेतात? आणि आम्ही सुद्धा प्रत्येक वेळी संकटात का पडतो? बंधूंनो ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याठायी, मला तुमच्याविषयी असलेल्या अभिमानाची शपथ घेऊन मी हे म्हणतो की, मी रोज रोज मरतो. मनुष्य स्वभावाप्रमाणे इफिसात मी रानटी प्राण्याबरोबर लढलो, तर मी काय मिळविले? जर मरण पावलेले उठवले जात नाहीत तर चला “आपण खाऊ पिऊ, कारण उद्या मरावयाचे आहे!”