YouVersion लोगो
सर्च आयकॉन

सफन्या 1

1
परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस
1यहूदाचा राजा आमोन ह्याचा पुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दित सफन्या बिन कूशी बिन गदल्या बिन अमर्‍या बिन हिज्कीया ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :
2“मी भूपृष्ठावरून सर्वकाही निखालस नाहीसे करीन,” असे परमेश्वर म्हणतो.
3“मी मनुष्य व पशू नष्ट करीन; मी आकाशातले पक्षी, समुद्रातले मासे, दुर्जन व त्यांचे अडथळे नाहीतसे करीन; भूपृष्ठावरून मानव नाहीतसे करीन,” असे परमेश्वर म्हणतो.
4“मी आपला हात यहूदावर, यरुशलेमेच्या सर्व रहिवाशांवर चालवीन; ह्या स्थलांतून बआलमूर्तीचे शेष नाहीतसे करीन, आणि मूर्तींचे पुजारी व याजक ह्यांचे नावही नाहीसे करीन;
5जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीही1 शपथ वाहतात,
6जे परमेश्वरापासून पराङ्मुख झाले आहेत, ज्यांनी परमेश्वराचे चरण धरले नाहीत व त्याचा शोध केला नाही, त्यांना मी नष्ट करीन.”
7प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा! कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे; परमेश्वराने यज्ञबलीची सिद्धता केली आहे, त्याने आपल्या आमंत्रितांना पवित्र केले आहे.
8परमेश्वराच्या यज्ञाच्या दिवशी असे होईल की, “सरदार, राजपुत्र व ज्या सर्वांनी परदेशी पोशाख चढवला आहे त्यांचा मी समाचार घेईन.
9त्या दिवशी जे उंबरठ्यावरून उडी मारून आपल्या प्रभूचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून टाकतात त्या सर्वांचा समाचार मी घेईन.”
10“त्या दिवशी मत्स्यवेशीतून ओरडण्याचा आवाज होईल, दुसर्‍या पेठेतून आक्रंदन होईल व टेकड्यांवरून मोठा धडाका उडेल,” असे परमेश्वर म्हणतो.
11“मक्तेशच्या2 रहिवाशांनो, आक्रंदन करा, कारण कनानाचे सर्व लोक नाश पावले आहेत, चांदीने लादलेले सर्व नाश पावले आहेत.
12त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की, ‘परमेश्वर बरे करत नाही व वाईटही करत नाही,’ त्यांचा मी समाचार घेईन.
13त्यांचा माल लुटला जाईल, त्यांची घरे उजाड होतील; ते घरे बांधतील, पण त्यांत वसणार नाहीत; द्राक्षीचे मळे लावतील, पण त्यांचा द्राक्षारस पिणार नाहीत.”
14परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे, वेगाने येत आहे; ऐका! परमेश्वराचा दिवस! तेथे वीर दुःखाने ओरडत आहे.
15हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे.
16तटबंदीच्या नगरांविरुद्ध व उंच बुरुजांविरुद्ध रणशिंगाचा व रणशब्दाचा हा दिवस आहे.
17मी माणसांवर संकट आणीन, ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे; त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील.
18परमेश्वराच्या क्रोधदिनी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील.

सध्या निवडलेले:

सफन्या 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन