जखर्या 10
10
परमेश्वराने आपल्या लोकांचा केलेला उद्धार
1वीज उत्पन्न करणार्या परमेश्वराजवळ वळवाच्या पावसाच्या वेळी पाऊस मागा म्हणजे तो त्यांच्यावर वृष्टी करील; तो प्रत्येकाच्या शेतात गवत उपजवील,
2कारण तेराफीम3 व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटे दृष्टान्त पाहिले आहेत व फसवणारी स्वप्ने सांगितली आहेत; ते कोरडा धीर देतात; ह्यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांच्यावर जुलूम होत आहे.
3“मेंढपाळांवर माझा क्रोध भडकला आहे, बोकडांचे मी शासन करीन; कारण सेनाधीश परमेश्वराने आपला कळप जे यहूदाचे घराणे त्याची भेट घेतली आहे, तो त्यांना आपल्या लढाईच्या सजवलेल्या घोड्यासारखे करील.
4त्याच्यापासूनच कोनशिला, त्याच्यापासूनच खुंटी, त्याच्यापासूनच युद्धधनुष्य, त्याच्यापासूनच प्रत्येक अधिकारी निघतो.
5वाटेतला चिखल तुडवत युद्धाला निघालेल्या योद्ध्याप्रमाणे ते होतील; ते युद्ध करतील, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे; घोडेस्वार फजीत होतील.
6मी यहूदाच्या घराण्यास शक्ती पुरवीन, योसेफाच्या घराण्याची मुक्तता करीन, देशात त्यांची वस्ती करीन; कारण त्यांच्यावर मी करुणा केली आहे; मी त्यांचा त्याग केलाच नाही असे ते होतील; कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे, मी त्यांचे ऐकेन.
7एफ्राईम वीरासारखा होईल, द्राक्षारसाने होते तसे त्यांचे हृदय हर्षित होईल; त्यांची मुले हे पाहून उल्लास पावतील; त्यांचे हृदय परमेश्वराच्या ठायी आनंदेल.
8मी शीळ घालून त्यांना जमा करीन; कारण मी त्यांना सोडवून घेतले आहे; त्यांची पूर्वी वृद्धी झाली तशी ते वृद्धी पावतील.
9मी राष्ट्रांमध्ये त्यांची पेरणी करीन; दूर देशात ते माझे स्मरण करतील; ते आपल्या मुलांसहित जिवंत राहून माघारी येतील.
10मी त्यांना मिसर देशातून माघारी आणीन; अश्शूर देशातून त्यांना एकत्र करीन; गिलाद व लबानोन ह्यांच्या भूमीवर त्यांना आणीन; त्यांना जागा पुरायची नाही.
11तो संकटसमुद्रातून पार जाऊन समुद्रलहरींना दबकावील; नील नदीचे सर्व गहिरे पाणी सुकून जाईल. अश्शूराचा गर्व उतरेल, मिसरचे राजवेत्र निघून जाईल.
12मी त्यांना परमेश्वराच्या ठायी बलवान करीन; ते त्याच्या नामाने येतील-जातील,” असे परमेश्वर म्हणतो.
सध्या निवडलेले:
जखर्या 10: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.