YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गीतरत्न 7:1-10

गीतरत्न 7:1-10 MARVBSI

हे राजकन्ये, तुझे पादत्राणयुक्त पाय किती सुंदर आहेत! कुशल कारागिराच्या हातांनी घडवलेल्या रत्नहारांसारख्या तुझ्या जांघा गोल आहेत. तुझी नाभी वाटोळा गरगरीत पेलाच आहे; त्यात मिश्रित द्राक्षारसाची वाण नाही, तुझे उदर सभोवती भुईकमळे लावलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे. तुझे कुचद्वय हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखे आहे. तुझा कंठ हस्तदंती मनोर्‍यासारखा आहे; तुझे नेत्र बाथ-रब्बीमच्या वेशीजवळील हेशबोनच्या कुंडांसारखे आहेत; तुझे नाक दिमिष्कासमोरील लबानोनाच्या बुरुजासारखे आहे. तुझा शिरोभाग कर्मेलासारखा आहे; तुझ्या डोक्याचे केस जांभळ्या वस्त्रासारखे आहेत; तुझ्या केशपाशात राजा बद्ध आहे. हे प्रिये, मनोरम विषयांमध्ये तू किती सुंदर, किती चित्ताकर्षक आहेस! तुझा हा बांधा तालवृक्षासारखा आहे; तुझे कुच द्राक्षांच्या घोसांसारखे आहेत. मी म्हटले, मी तालवृक्षावर चढून त्याच्या शाखा धरीन; तेव्हा तुझे कुच मला द्राक्षांच्या घोसांसमान व्हावेत, आणि तुझ्या नासिकेचा श्वास सफरचंदाच्या सुवासासमान व्हावा. तुझे मुख उत्तम द्राक्षारसासमान व्हावे; तो माझ्या प्रियेप्रीत्यर्थ घशात नीट उतरतो; निद्रिस्तांच्याही तोंडांतून तो खाली सहज जातो. मी आपल्या वल्लभाची आहे; त्याचे मन माझ्यावर बसले आहे.