YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रूथ 1:1-20

रूथ 1:1-20 MARVBSI

शास्त्यांच्या अमदानीत देशात दुष्काळ पडला त्या दिवसांत बेथलेहेम-यहूदा येथील एक पुरुष आपली स्त्री व दोन पुत्र ह्यांना घेऊन मवाब देशात काही दिवस राहायला गेला. त्या पुरुषाचे नाव अलीमलेख व त्याच्या स्त्रीचे नाव नामी आणि त्यांच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्योन अशी होती; हे एफ्राथी म्हणजे बेथलेहेम-यहूदा येथील रहिवासी होते; ते मवाब देशात जाऊन राहिले. पुढे नामीचा पती अलीमलेख हा वारला आणि नामी व तिचे दोन पुत्र मागे राहिले. त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया बायका केल्या; एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे सुमारे दहा वर्षे राहिले. नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले; ह्याप्रमाणे नामी आपले दोन मुलगे व आपला पती ह्यांना अंतरली. परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यांना अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मवाब देशात कळले, तेव्हा त्या देशातून आपल्या दोन्ही सुनांसह परत जाण्यास ती निघाली. ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती तेथून निघून यहूदा देशास जायला मार्गस्थ झाली. नामी आपल्या सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा; तुम्ही जशी माझ्या मृतांवर व माझ्यावर माया केली तशीच परमेश्वर तुमच्यावर करो. परमेश्वर करो आणि तुम्हांला पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो.” मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या गळा काढून रडू लागल्या. त्या तिला म्हणू लागल्या, “नाही, नाही; आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे येणार.” नामी म्हणाली, “माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही माझ्याबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील? माझ्या मुलींनो, माघारी जा; मी आता वृद्ध झाले आहे, नवरा करण्याचे माझे वय नाही; मी म्हटले की मला पती मिळायची आशा आहे व आजच रात्री तो मिळाला आणि मला पुत्रही झाले, तरी ते प्रौढ होतील तोपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवर्‍यांवाचून राहाल काय? छे, छे, माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे; परमेश्वराचा हात माझ्यावर पडला आहे.” मग पुन्हा त्या गळा काढून रडू लागल्या; अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला; पण रूथ तिला बिलगून राहिली. तेव्हा ती म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.” रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका; तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव; तुम्ही मराल तेथे मीही मरेन व तेथेच माझी मूठमाती होईल; मृत्युखेरीज तुमचा-माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर माझे त्यानुसार पारिपत्य करो, किंबहुना अधिक करो.” आपल्याबरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्‍चय झाला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिची समजूत घालण्याचे सोडले. मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेहेमास पोहचल्या. त्या बेथलेहेमास जाऊन पोहचल्या, तेव्हा त्यांना पाहून सर्व नगर गलबलून गेले; तेथील बायका म्हणू लागल्या, “ही नामीच काय?” ती त्यांना म्हणाली, “मला नामी (मनोरमा) म्हणू नका तर मारा (क्लेशमया) म्हणा; कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे.

रूथ 1 वाचा

ऐका रूथ 1