कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे.
कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणार्यामुळे.
सृष्टीही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते.
कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे.
इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथमफळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कण्हत आहोत.
कारण आपण अशी आशा धरून तरलो; जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील?
पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो.
तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वत: अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो.
आणि अंतर्यामे पारखणार्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो.
परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.
कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले; ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा.
ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले; आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला.
तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?
ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्वकाही कसे देणार नाही?
देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे.
तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे.
ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय?
शास्त्रात लिहिल्याप्रमाणे,
“तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे;
कापायच्या मेंढरासारखे आम्हांला गणले आहे.”
उलटपक्षी, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.
कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले,
उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही.