YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 7:14-24

रोमकरांस पत्र 7:14-24 MARVBSI

कारण आपल्याला ठाऊक आहे की, नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे; मी तर दैहिक, पापाला विकलेला असा आहे. कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही; म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते तेच करतो. जे मी इच्छीत नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. तर आता ह्यापुढे ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते. कारण मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही; कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो, तर ते कर्म मी करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते. तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो; तरी माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?