YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 6:15-23

रोमकरांस पत्र 6:15-23 MARVBSI

तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही! आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हांला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले, आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाची स्तुती असो. तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे; कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरता अमंगळपण व स्वैराचार ह्यांस गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्त्वाला गुलाम असे समर्पण करा. तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्त्वासंबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हांला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.