YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 6:11-18

रोमकरांस पत्र 6:11-18 MARVBSI

तसे तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याद्वारे स्वत:स पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना. ह्यास्तव तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये; आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही! आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हांला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले, आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाची स्तुती असो.