YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 6:1-14

रोमकरांस पत्र 6:1-14 MARVBSI

तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही! जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार? किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो; ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. हे आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपल्याला ठाऊक आहे की, मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही; त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला, तो जगतो तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याद्वारे स्वत:स पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना. ह्यास्तव तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये; आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही.