तर हे आशीर्वचन सुंता झालेल्यांना आहे किंवा सुंता न झालेल्यांनाही आहे? कारण ‘विश्वास हा अब्राहामाकडे नीतिमत्त्व असा गणण्यात आला होता,’ असे आपण म्हणतो. तो कसा गणण्यात आला? तो सुंता झालेला असताना किंवा सुंता न झालेला असताना? सुंता झालेला असताना नव्हे, तर सुंता न झालेला असताना, आणि तो ‘सुंता न झालेला असताना’ त्याच्या ठायी असलेल्या विश्वासामुळे जे नीतिमत्त्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून ‘सुंता ही खूण’ त्याला मिळाली; ह्यासाठी की, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्त्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे. आणि त्याने सुंता झालेल्या लोकांचाही बाप व्हावे, पण केवळ ते सुंता झालेले आहेत म्हणून नव्हे तर आपला पिता अब्राहाम सुंता न झालेला असता त्याचा जो विश्वास होता, त्यालाही अनुसरून चालतात म्हणून त्यांचा बाप व्हावे. कारण तू जगाचा वारस होशील, हे अभिवचन अब्राहामाला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्वासामुळे प्राप्त होणार्या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते. कारण जे नियमशास्त्राचे आहेत ते जर वारस होतात, तर विश्वास निरर्थक झाला आहे आणि अभिवचन व्यर्थ झाले आहे. कारण नियमशास्त्र क्रोधाला कारणीभूत होते; परंतु जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघनही नाही. ह्या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे म्हणून ते विश्वासाने आहे; अशासाठी की, ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा पिता जो अब्राहाम त्याचा जो विश्वास होता, त्याला अनुसरून जे चालतात, त्यांनाही निश्चित व्हावे. “मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे” असे अब्राहामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे — त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. “तशी तुझी संतती होईल,” ह्या वचनाप्रमाणे त्याने ‘बहुत राष्ट्रांचा बाप’ व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता, आपले निर्जीव झालेले शरीर (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली; परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला; आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती. म्हणूनच “ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले.” ‘ते त्याच्याकडे गणण्यात आले,’ हे केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यांमधून उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणार्या आपणांसाठीही ते लिहिलेले आहे, त्या आपणांलाही ते गणले जाणार आहे. तो प्रभू येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे.
रोमकरांस पत्र 4 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 4:9-25
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ