YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 3:1-31

रोमकरांस पत्र 3:1-31 MARVBSI

तर मग यहूदी असण्यात फायदा तो काय? अथवा सुंतेपासून झालेला लाभ तो कोणता? सर्व बाबतींत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांना सोपवून दिली होती. कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय? कधीच नाही! देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो; शास्त्रातही लिहिलेले आहे की, “तू आपल्या वचनात नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा.” पण आपल्या अनीतीमुळे जर देवाचे नीतिमत्त्व स्थापित होते, तर ह्यावरून आपण काय म्हणावे? देव जो क्रोधाने शासन करतो तो अनीतिमान आहे, असे म्हणावे की काय? (मी हे मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे.) कधीच नाही! असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करील? तसेच माझ्या लबाडीवरून देवाचे सत्य त्याच्या गौरवासाठी विपुल असल्याचे दिसून आले तरी एखाद्या पापी माणसाप्रमाणे मीही शिक्षेस पात्र का ठरावे? आणि बरे घडून यावे म्हणून आपण वाईट करू या, असे आपण का म्हणू नये? — आम्ही असेच म्हणतो असा कित्येक लोक आमच्यावर आळ घेतात — अशा लोकांची दंडाज्ञा यथान्याय आहे. तर मग काय? आम्ही यहूदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही; कारण यहूदी व हेल्लेणी हे सर्व पापवश आहेत असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेवला आहे; शास्त्रात असे लिहिलेले आहे की, “नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही; समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही; सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही.” “त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे; त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे; त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे.” “त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे.” “त्यांचे पाय रक्तपात करण्यास जाण्याकरता उतावळे झाले आहेत; त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत; त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही.” “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.” आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही; कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्त्वाची प्राप्ती आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्त्व ते प्रकट झाले आहे; त्याला नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष आहे; हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे; त्यात भेदभाव नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे; म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्‍याला नीतिमान ठरवणारे असावे. तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्मांच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. कारण नियमशास्त्रातील कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो. किंवा देव केवळ यहूद्यांचा आहे काय? तो परराष्ट्रीयांचाही नव्हे काय? हो, आहे. देव जर एकच आहे, आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व न झालेल्यांना तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवील तर तो परराष्ट्रीयांचाही देव आहे. तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? कधीच नाही! उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो.