YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 2:1-16

रोमकरांस पत्र 2:1-16 MARVBSI

तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही; कारण ज्यात तू दुसर्‍याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस. पण अशा गोष्टी करणार्‍यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणार्‍यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? की, आपल्या हटवादीपणाने पश्‍चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस? तो प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच; परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप, संकट व क्लेश येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जिवावर ती येतील; पण सत्कृत्य करणारा प्रत्येक, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी, ह्यांना गौरव, सन्मान व शांती ही मिळतील. कारण देवाजवळ पक्षपात नाही. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्राव्यतिरिक्त नाश पावतील आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल. कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरवण्यात येतील. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावत: करत असतात, तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही, तरी ते स्वत:च आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंत:करणात लिहिलेला आहे असे दाखवतात; त्यांच्याबरोबर त्यांची सदसद्विवेकबुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां-विषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात. ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल.