आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाने शेजार्याची उन्नती होण्याकरता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही; तर “तुझी निंदा करणार्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे ते झाले. धीराच्या व शास्त्रापासून मिळणार्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले. आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचा गौरव करावा म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे. म्हणून देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्चित करावीत आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की, “म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.” “परराष्ट्रीयांनो, त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा,” असे तो पुन्हा म्हणतो. “सर्व परराष्ट्रीयांनो, परमेश्वराचे स्तवन करा; आणि सर्व लोक त्याचे स्तवन करोत,” असेही तो पुन्हा म्हणतो. आणखी यशया म्हणतो, “इशायाला अंकुर फुटेल, तो परराष्ट्रीयांवर अधिकार करण्यास उभा राहील; त्याच्यावर परराष्ट्रीय आशा ठेवतील.” आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.
रोमकरांस पत्र 15 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 15:1-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ