जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा; पण शंकाकुशंकांचा निर्णय लावण्याकरता करू नका. एखाद्याचा विश्वास असा असतो की, त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बळ शाकभाजीच खातो. जो खातो त्याने न खाणार्याला तुच्छ मानू नये, आणि जो खात नाही त्याने खाणार्याला दोष लावू नये; कारण देवाने त्याला जवळ केले आहे. दुसर्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर स्थिर करण्यात येईल; कारण त्याला स्थिर करण्यास त्याचा धनी समर्थ आहे. कोणी माणूस एखादा दिवस दुसर्या दिवसापेक्षा अधिक मानतो. दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खातरी करून घ्यावी. जो दिवस पाळतो, तो प्रभूकरता पाळतो, [आणि जो पाळीत नाही तो प्रभूकरता पाळत नाही;] आणि जो खातो तो प्रभूकरता खातो, कारण तो देवाचे आभार मानतो; जो खात नाही, तो प्रभूकरता खात नाही, आणि तोही देवाचे आभार मानतो. कारण आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. कारण ख्रिस्त ह्यासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की, त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे. तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे, त्या अर्थी माझ्यापुढे प्रत्येक गुडघा टेकेल, व प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील.” तर मग आपल्यातील प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयीचा हिशेब देवाला देईल. ह्याकरता आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये; तर असे ठरवून टाकावे की, कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडखळण ठेवू नये. मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूमध्ये माझी खातरी आहे की, कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही; तथापि अमुक पदार्थ निषिद्ध आहे, असे समजणार्याला तो निषिद्धच आहे. अन्नामुळे तुझ्या भावाला दुःख झाले तर तू प्रीतीने वागेनासा झाला आहेस. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा नाश तू आपल्या अन्नाने करू नकोस. म्हणून तुम्हांला जे उत्तम लाभले आहे त्याची निंदा होऊ नये. कारण खाणे व पिणे ह्यांत देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यांत ते आहे. कारण ह्या प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला ग्रहणीय व मनुष्यांना पसंत आहे. तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक होणार्या गोष्टी ह्यांच्यामागे आपण लागावे. अन्नाकरता देवाचे कार्य ढासळून पाडू नकोस. सर्व पदार्थ शुद्ध आहेत; परंतु जो माणूस अडखळण होईल अशा रीतीने खातो, त्याला ते वाईट आहे. मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो [किंवा अडखळतो अथवा अशक्त होतो] ते न करणे हे चांगले. तुझ्या ठायी जो विश्वास आहे तो तू देवासमक्ष मनातल्या मनातच असू दे. आपणाला जे काही पसंत आहे त्याविषयी जो स्वत:ला दोष लावत नाही तो धन्य. पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही; आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे.
रोमकरांस पत्र 14 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 14:1-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ