YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 13:1-14

रोमकरांस पत्र 13:1-14 MARVBSI

प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकारी आहेत ते देवाने नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाराला आड येतो, तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणांवर दंड ओढवून घेतील. कारण चांगल्या कामाला अधिकार्‍यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकार्‍याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल; कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग; कारण तो तलवार व्यर्थ धारण करत नाही; तर क्रोध दाखवण्याकरता वाईट करणार्‍याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे. म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेही अधीन राहणे अगत्याचे आहे. ह्या कारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्याच सेवेत तत्पर असतात. ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या; ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या; ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा. एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका; कारण जो दुसर्‍यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. कारण “व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, लोभ धरू नकोस,” ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर,” ह्या वचनात आहे. प्रीती शेजार्‍याचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे; कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे; म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी. दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.