YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 10:1-13

रोमकरांस पत्र 10:1-13 MARVBSI

बंधुजनहो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की, त्यांचे तारण व्हावे. मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्त्व स्थापण्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्त्वाला ते वश झाले नाहीत. कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्त्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. कारण मोशे असे लिहितो, “जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्त्व आचरतो तो तेणेकरून वाचेल.” परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व म्हणते, “तू आपल्या मनात म्हणू नकोस की, उर्ध्वलोकी कोण चढेल?” (अर्थात ख्रिस्ताला खाली आणण्यास). किंवा “अधोलोकी कोण उतरेल?” (अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यांतून वर आणण्यास). तर ते काय म्हणते? “ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे”; (आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहोत) ते हेच आहे की, येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्या मुखाने’ कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा ‘आपल्या अंत:करणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंत:करणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.1 कारण शास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजीत होणार नाही.’ यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही; कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्याइतका तो संपन्न आहे. कारण “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.”