YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 7:9-17

प्रकटी 7:9-17 MARVBSI

ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते : “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकर्‍याकडून, तारण आहे!” तेव्हा राजासन, वडीलमंडळ व चार प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते, ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले : “आमेन; धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ हे युगानुयुग आमच्या देवाचे आहेत! आमेन.” तेव्हा वडीलमंडळापैकी एकाने मला म्हटले, “शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले?” मी म्हटले, “प्रभो, हे तुला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या ‘संकटातून’ येतात ते हे आहेत; ह्यांनी ‘आपले झगे’ कोकर्‍याच्या ‘रक्तात धुऊन’ शुभ्र केले आहेत. ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि ‘राजासनावर बसलेला’ त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील. ते ह्यापुढे ‘भुकेले असे होणार नाहीत, व तान्हेलेही होणार नाहीत; त्यांना सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही.’ कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा ‘मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्‍यांजवळ नेईल; आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील.”’