YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 19:1-10

प्रकटी 19:1-10 MARVBSI

ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘हालेलूया!’ तारण, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही प्रभू जो आमचा देव ह्याची आहेत; कारण ‘त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे’ व ‘नीतीचे’ आहेत; ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आणि आपल्या ‘दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.”’ ते दुसर्‍यांदा म्हणाले, “हालेलूया! तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.” तेव्हा ते चोवीस वडील व ते चार प्राणी उपडे पडून ‘राजासनावर बसलेल्या’ देवाला नमन करताना म्हणाले, “आमेन; हालेलूया!” इतक्यात ‘राजासनापासून’ वाणी झाली; ती म्हणाली, “अहो आमच्या देवाची ‘भीती बाळगणार्‍या सर्व लहानथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”’ तेव्हा ‘जणू काय’ मोठ्या ‘समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी’ व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला; तो म्हणाला, “‘हालेलूया; कारण’ सर्वसमर्थ आमचा ‘प्रभू’ देव ह्याने ‘राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद’ व ‘उल्लास करू’ व त्याचा गौरव करू; कारण कोकर्‍याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे;” ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, “हे लिही की, कोकर्‍याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.” तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो; परंतु तो मला म्हणाला, “असे करू नये; मी तुझ्या सोबतीचा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर;” कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म1 आहे.