YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 18:2-17

प्रकटी 18:2-17 MARVBSI

तो जोरदार वाणीने म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली;’ ती ‘भुतांची वस्ती’ व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे. कारण, ‘तिच्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रे प्याली आहेत; पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ केले व पृथ्वीवरील व्यापारी तिने आपल्या विषयभोगास खर्चलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले.” मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘माझ्या लोकांनो,’ तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून ‘तिच्यामधून निघा.’ कारण तिच्या ‘पापांची रास स्वर्गापर्यंत पोहचली’ आहे; आणि तिची अनीती देवाने लक्षात घेतली आहे. ‘जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे’ तिला दुप्पट द्या; तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी त्यात ओता. ज्या मानाने तिने आपला गौरव केला व विषयभोग घेतला, त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या; कारण ती ‘आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे; मी काही विधवा नाही; मी दुःख पाहणारच नाही.’ ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ ‘एका दिवशीच येतील,’ आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल; कारण तिचा ‘न्यायनिवाडा करणारा प्रभू’ देव ‘सामर्थ्यवान’ आहे.” ‘पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ व विलास ‘केला’ ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हा तिच्याकरता ‘रडतील व ऊर बडवून घेतील.’ ते म्हणतील, “अरेरे! ‘बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती!’ एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.” पृथ्वीवरील ‘व्यापारी’ तिच्यासाठी ‘रडतात व शोक करतात;’ कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही; सोने, रुपे, मोलवान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, जांभळ्या रंगाचे कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगाचे कापड, सर्व प्रकारची सुगंधी लाकडे, सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, सर्व प्रकारची अति मोलवान लाकडाची, पितळेची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे; दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, सपीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम, व ‘मनुष्यांचे जीव’ हा त्यांचा माल कोणी घेत नाही. “ज्या फळफळावळीची तुझ्या जिवाला चटक लागली आहे, ती तुझ्यापासून गेली आहे; आणि मिष्टान्ने व विलासाचे पदार्थ हे सर्व तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत; ते पुढे कोणाला मिळणारच नाहीत!” तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे ‘व्यापारी रडत व शोक करत’ तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील; आणि म्हणतील, “अरेरे! पाहा, ही मोठी नगरी! तागाची बारीक वस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली, सोने, मोलवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली नगरी! एका घटकेत ह्या इतक्या संपत्तीची राख झाली.” सर्व ‘तांडेल’ गलबतांवरून बंदरोबंदरी जाणारे सर्व, आणि ‘खलाशी व समुद्रावर’ जितके उद्योगधंदा करणारे होते तितके दूर ‘उभे राहिले,’