YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 12:7-17

प्रकटी 12:7-17 MARVBSI

मग स्वर्गात युद्ध सुरू झाले; ‘मीखाएल’ व त्याचे दूत अजगराबरोबर ‘युद्ध करण्यास’ निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले; तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल1 व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली, “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकर्‍याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले; आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीती केली नाही. म्हणून ‘स्वर्गांनो’ व त्यांत राहणार्‍यांनो, ‘उल्लास करा!’ पृथ्वी व समुद्र ह्यांत राहणार्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.” आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत असे पाहून अजगराने पुंसंतान प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला. त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते; तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक ‘काळ, दोन काळ व अर्धकाळ’ तिचे पोषण व्हायचे होते. मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून नदीसारखा पाण्याचा प्रवाह सोडला; परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले; तिने ‘आपले तोंड उघडून’ अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी ‘गिळून टाकली.’ तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला