नंतर काठीसारखा एक ‘बोरू’ कोणीएकाने मला दिला, आणि म्हटले : “ऊठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक ह्यांचे माप घे. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस; कारण ते ‘परराष्ट्रीयांना दिले’ आहे; आणि ते बेचाळीस महिने पवित्र नगरी ‘तुडवतील.’ माझे दोन साक्षी ह्यांना मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील.” ‘पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची दोन झाडे’ व ‘दोन समया’ ही ते आहेत. त्यांना कोणी उपद्रव करू पाहिल्यास ‘त्यांच्या तोंडांतून अग्नी निघून त्यांच्या वैर्यांना खाऊन टाकतो;’ कोणी त्यांना उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला ह्याचप्रमाणे जिवे मारण्यात यावे. त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसांत ‘पाऊस पडू नये’ म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे; ‘पाण्याचे रक्त करण्याचा’ अधिकार त्यांना पाण्यावर आहे, आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला ‘सर्व पीडांनी पीडित करण्याचाही’ त्यांना अधिकार आहे. त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर ‘अथांग डोहातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील’ आणि ‘त्यांना जिंकून’ जिवे मारील; आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर, आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळण्यात आले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. लोक, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यांतील लोक ती त्यांची प्रेते साडेतीन दिवस पाहतील आणि ती कबरांत ठेवू देणार नाहीत. आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व ‘उल्लास करतील’ व एकमेकांना भेटी पाठवतील; कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणार्यांना पीडा दिली होती. पुढे साडेतीन दिवसांनंतर ‘जीवनाचा आत्मा’ देवापासून येऊन ‘त्यांच्यामध्ये शिरला तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले;’ आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे ‘भय वाटले.’ तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपल्याबरोबर बोलताना ऐकली, ती म्हणाली, “इकडे वर या.” मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या वैर्यांच्या देखत ‘स्वर्गात’ वर गेले. त्याच घटकेस ‘मोठा भूमिकंप’ झाला. तेव्हा त्या नगराचा दहावा भाग ‘पडला,’ भूमिकंपाने सात हजार माणसे ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी ‘स्वर्गीय देवाचा’ गौरव केला. दुसरा अनर्थ होऊन गेला आहे; पाहा, तिसरा अनर्थ लवकर होणार आहे. सातव्या देवदूताने कर्णा वाजवला; तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या : “जगाचे ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे’ झाले आहे; आणि ‘तो युगानुयुग राज्य करील.”’ तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, “हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था; जो तू आहेस व होतास [व येणार], तो तू, आपले महान सामर्थ्य धारण केले आहेस आणि ‘राज्यारूढ झाला आहेस’ म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ‘राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली,’ तुझ्या ‘क्रोधाची’ वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि ‘तुझे दास संदेष्टे’ व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासाडी करणार्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.” तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले, ‘त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश’ दृष्टीस पडला आणि ‘विजा’ चमकल्या, ‘गर्जना’ व मेघांचे गडगडाट झाले, भूमिकंप झाला व ‘मोठ्या गारांची वृष्टीही’ झाली.
प्रकटी 11 वाचा
ऐका प्रकटी 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 11:1-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ