YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 92:1-15

स्तोत्रसंहिता 92:1-15 MARVBSI

परमेश्वराचे उपकारस्मरण करणे, हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभातसमयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे, दशतंतुवाद्य, सतार व वीणा ह्यांच्या साथीने, गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहेस; तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जयजयकार करतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की, दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच. हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ उच्च स्थानी आहेस. हे परमेश्वरा, पाहा, तुझे वैरी, पाहा, तुझे वैरी नाश पावतील; सर्व दुष्कर्म्यांची दाणादाण होईल. पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगांप्रमाणे उन्नत केले आहेस, मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे. माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत; माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्यांसंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील; ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठायी अन्याय मुळीच नाही.