हे देवा, तुझ्या वतनात परराष्ट्रे शिरली आहेत; त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे; त्यांनी यरुशलेमेचे ढिगारे केले आहेत. त्यांनी आकाशातल्या पाखरांना तुझ्या सेवकांची प्रेते, व पृथ्वीवरील पशूंना तुझ्या भक्तांचे मांस खाण्यास दिले आहे. त्यांनी यरुशलेमेभोवती त्यांचे रक्त पाण्यासारखे वाहवले; त्यांना पुरण्यास कोणी राहिले नाही. आम्ही आमच्या शेजार्यांना निंदास्पद आणि आमच्या सभोवतालच्या लोकांना तुच्छ व हास्यास्पद झालो आहोत. हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्वकाळ कोपायमान राहणार काय? तुझा रोष अग्नीसारखा भडकत राहणार काय? जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, जी राज्ये तुझे नाव घेऊन धावा करीत नाहीत, त्यांच्यावर तू आपल्या क्रोधाचा मारा कर. कारण त्यांनी याकोब वंशाला गिळून टाकले आहे, व त्यांची वस्ती ओसाड केली आहे. आमच्याविरुद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्मे आठवू नकोस; तुझी करुणा आमच्यावर सत्वर होवो; कारण आम्ही फार दुर्दशेत पडलो आहोत. हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या महिम्यासाठी आम्हांला साहाय्य कर; आपल्या नावासाठी आम्हांला सोडव व आमची पातके धुऊन टाक. “ह्यांचा देव कोठे आहे,” असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचा रक्तपात झाला त्याबद्दल सूड उगवण्यात आला आहे, हे आमच्यादेखत राष्ट्रांना कळू दे. बंदिवानांचे कण्हणे तुझ्या कानी येवो; ज्यांचा वध करण्याचे ठरले आहे त्यांना तू आपल्या बाहुबलाने वाचव. हे प्रभू, आमच्या शेजार्यांनी केलेली तुझी निंदा उलट त्यांच्या पदरी सातपटीने घाल.
स्तोत्रसंहिता 79 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 79
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 79:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ