हे देवा, मला वाचव; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन भिडले आहे. मी खोल दलदलीत रुतलो आहे, तेथे उभे राहण्यास आधार नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, आणि लोंढा माझ्यावरून जात आहे. आरोळी मारता मारता मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; आपल्या देवाची वाट पाहता पाहता माझे डोळे शिणले आहेत. विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत; अन्यायाने माझ्याशी वैर करणारे, माझा जीव घेऊ पाहणारे, बलिष्ठ आहेत; मी हरण केले नव्हते तेही मला द्यावे लागले. हे देवा, तू माझे मूर्खपण जाणतोस; आणि तुझ्यापुढे माझी पातके लपलेली नाहीत. हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतीक्षा करतात त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये; हे इस्राएलाच्या देवा, जे तुझा शोध करतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये. कारण तुझ्यासाठी मी निंदा सोसली आहे; लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे; मी आपल्या भावांना नवखा, माझ्या सहोदरांना परका असा झालो आहे. कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, निंदा करणार्यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे. मी उपास करून शोक केला, तेच माझ्या निंदेस कारण झाले. मी गोणपाटाचे कपडे चढवले, तेव्हा मी त्यांच्या उपहासाचा विषय झालो. वेशीत बसणारे माझ्याविषयी बोलत असतात, मी मद्यपी लोकांच्या गीतांचा विषय झालो. मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे. चिखलातून मला काढ, मला रुतू देऊ नकोस; मला माझ्या द्वेष्ट्यांपासून मुक्त कर व खोल पाण्यातून मला काढ. पाण्याचा लोंढा माझ्यावरून जाऊ देऊ नकोस; दलदलीत मला खचू देऊ नकोस; गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नकोस. हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे; आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ. आपल्या दासापासून तू आपले मुख लपवू नकोस; कारण मी संकटात आहे; माझे सत्वर ऐक; माझ्या जिवाजवळ येऊन त्याचा उद्धार कर; माझे वैरी पाहून माझा उद्धार कर.
स्तोत्रसंहिता 69 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 69
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 69:1-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ