YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 34

34
पीडेपासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र; त्याने अबीमलेखासमोर बुद्धिभ्रंश झाल्याचे सोंग केल्यावर त्याला हाकून लावण्यात आले आणि तो निघून गेला तेव्हाचे.
1परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल.
2माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील; दीन हे ऐकून हर्ष करतील.
3तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा; आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.
4मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.
5ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले; त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत.
6ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला, आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडवले.
7परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.
8परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य!
9परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणार्‍यांना काही उणे पडत नाही.
10तरुण सिंहांनाही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणार्‍यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.
11मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हांला परमेश्वराचे भय धरायला शिकवीन.
12सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा; व दीर्घायुष्याची इच्छा धरणारा असा मनुष्य कोण?
13तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर,
14वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर.
15परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.
16वाईट करणार्‍यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो.
17नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो.
18परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.
19नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो.
20त्याची सर्व हाडे तो सांभाळतो; त्यांतले एकही मोडत नाही.
21दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार; नीतिमानाचे द्वेष्टे दंड पावतात.
22परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 34: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन