YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 18:30-50

स्तोत्रसंहिता 18:30-50 MARVBSI

देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे; परमेश्वराचे वचन कसास उतरले आहे; त्यांचा आश्रय करणार्‍या सर्वांची तो ढाल आहे. परमेश्वरावाचून देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे? तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो, तो माझा मार्ग निर्वेध करतो. तो माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतो, आणि उंच जागांवर माझी स्थापना करतो. तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे दंड पितळी धनुष्य वाकवतात. तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहेस; आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहेस; तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस, माझे पाय घसरले नाहीत. मी आपल्या वैर्‍यांच्या पाठीस लागून त्यांना गाठले; आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही. मी त्यांना इतका मार दिला की त्यांना उठता येईना, त्यांना मी पायांखाली तुडवले. लढाईसाठी तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधला; माझ्यावर उठलेल्यांना तू माझ्याखाली चीत केलेस. तू माझ्या वैर्‍यांना पाठ दाखवायला लावले, मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला. त्यांनी ओरड केली तरी त्यांना सोडवायला कोणी नव्हता; त्यांनी परमेश्वराचा धावा केला तरी त्याने त्यांचे ऐकले नाही. तेव्हा वार्‍याने उडणार्‍या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले; रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना काढून टाकले, लोकांच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस; तू मला राष्ट्रांचा प्रमुख केलेस; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले. माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते माझ्या अधीन झाले; परदेशीय लोकांनी माझी खुशामत केली. परदेशीय लोक गलित झाले; ते आपल्या कोटांतून कापत कापत बाहेर आले, परमेश्वर जिवंत आहे; त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो; माझे तारण करणार्‍या देवाचा महिमा वाढो; त्याच देवाने मला सूड उगवू दिला, राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले. तोच मला माझ्या वैर्‍यांपासून सोडवतो, माझ्याविरुद्ध उठणार्‍यांवर तू माझे वर्चस्व करतोस, जुलमी मनुष्यांपासून मला सोडवतोस. म्हणून हे परमेश्वरा, मी राष्ट्रांमध्ये तुझे स्तवन करीन, तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन. तो आपल्या राजाला मोठे विजय देतो; आपल्या अभिषिक्ताला, दाविदाला व त्याच्या संततीला, सर्वकाळ वात्सल्य दाखवतो.