YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 139:1-24

स्तोत्रसंहिता 139:1-24 MARVBSI

हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस. माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागूनपुढून मला वेढले आहेस, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस; अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पाहा, तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, तरी तेथेही तुझा हात मला चालवील; तुझा उजवा हात मला धरून ठेवील. “अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख होवो,” असे जरी मी म्हणालो, तरी अंधकारदेखील तुझ्यापासून काहीएक लपवत नाही; रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे! ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील; मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो. हे देवा, तू दुर्जनांना ठार मारून टाक; अहो रक्तपात करणार्‍यांनो, माझ्यापासून दूर व्हा. ते तुझ्याविरुद्ध कपटाने बोलतात, तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. तुझा द्वेष करणार्‍यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणार्‍यांचा मला वीट का येऊ नये? मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो; मी त्यांना आपले शत्रू मानतो. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव.