YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:41-80

स्तोत्रसंहिता 119:41-80 MARVBSI

हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो. तुझ्या वचनाप्रमाणे तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो; म्हणजे माझी निंदा करणार्‍याला मला उत्तर देता येईल, कारण तुझ्या वचनावर माझा भरवसा आहे. तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नकोस, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे. म्हणजे मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन. मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. मी राजांसमोरसुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही. मी तुझ्या आज्ञांत आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत. तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आपले हात उभारीन. आणि तुझ्या नियमांचे मनन करीन. तू आपल्या दासाला दिलेले वचन आठव, कारण तू मला आशा लावली आहेस. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते. गर्विष्ठांनी माझा फार उपहास केला, तरी मी तुझ्या नियमशास्त्रापासून बहकलो नाही. हे परमेश्वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान झाले आहे. दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करतात, म्हणून मला फार संताप येतो. माझ्या संसारयात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहेत. हे परमेश्वरा, मी रात्री तुझ्या नावाचे स्मरण केले आहे. आणि तुझे नियमशास्त्र पाळले आहे. मी तुझे विधी आचरले आहेत म्हणून मला हे प्राप्त झाले आहे. परमेश्वर माझा वाटा आहे. तुझी वचने पाळण्याचा मी निश्‍चय केला आहे. मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे. आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर. आपल्या वर्तनक्रमाविषयी विचार करून मी तुझ्या निर्बंधांकडे पावले वळवली. मी तुझ्या आज्ञा पाळण्याची त्वरा केली, मी विलंब लावला नाही. दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टले, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुझे उपकारस्मरण करण्यास मी मध्यरात्री उठतो. तुझे भय धरणार्‍या सर्वांचा, तुझे विधी पाळणार्‍यांचा, मी सोबती आहे. हे परमेश्वरा, तुझ्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे; तू आपले नियम मला शिकव. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहेस. विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे. मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळत आहे. तू चांगला आहेस, तू चांगले करतोस. तुझे नियम मला शिकव. गर्विष्ठांनी माझ्यावर आळ घेतला आहे; तरी मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन. त्यांचे मन कठीण झाले आहे; मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे. तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडवले; तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे. तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करतील; कारण मी तुझ्या वचनाची आशा धरली आहे. हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत, आणि सत्यतेने तू मला पिडले आहेस हे मी जाणतो. तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे. माझ्यावर करुणा कर म्हणजे मी जगेन; कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. गर्विष्ठ फजीत होवोत, कारण त्यांनी लबाडीने माझ्यावर अन्याय केला आहे; मी तर तुझ्या विधींचे मनन करीन. तुझे भय धरणारे माझ्याकडे पाहोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील. मी लज्जित होऊ नये म्हणून माझे चित्त तुझ्या नियमांकडे पूर्णपणे लागू दे.