YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:161-176

स्तोत्रसंहिता 119:161-176 MARVBSI

अधिपती माझ्या पाठीस विनाकारण लागले आहेत; परंतु माझे हृदय तुझ्या वचनांचे भय धरते. मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो. मी असत्याचा द्वेष करतो व त्याचा वीट मानतो; परंतु तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. तुझ्या न्याय्य निर्णयांसाठी मी दिवसातून सात वेळा तुझे स्तवन करतो. तुझे नियमशास्त्र प्रिय मानणार्‍यांना फार शांती असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही. हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी प्रतीक्षा करीत आहे; तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत. माझा जीव तुझे निर्बंध पाळतो; व ते मला अत्यंत प्रिय आहेत. मी तुझे विधी व तुझे निर्बंध पाळतो; कारण माझा सर्व वर्तनक्रम तुझ्यापुढे आहे. हे परमेश्वरा, माझी आरोळी तुझ्यापर्यंत पोहचो; तू आपल्या वचनानुसार मला बुद्धी दे. माझी विनंती तुझ्यापुढे येवो; तू आपल्या वचनानुसार मला मुक्त कर. तू मला आपले नियम शिकवतोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो. माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत. तुझा हात मला साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण मी तुझे विधी स्वीकारले आहेत. हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी उत्कंठा धरली आहे; तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. माझा जीव वाचो, म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला साहाय्य करोत. हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे; तू आपल्या दासाचा शोध कर; कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही.