तुझे निर्बंध आश्चर्यकारक आहेत, म्हणून माझा जीव ते पाळतो. तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला. तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची आवड धरणार्यांवर करतोस तशी कृपा माझ्यावर कर. तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर, आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नकोस. मनुष्याच्या जुलमापासून मला मुक्त कर, म्हणजे मी तुझे विधी पाळीन. तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड; आणि तुझे नियम मला शिकव. लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात. हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस; तुझे निर्णय सरळ आहेत. तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत. माझ्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, कारण माझे शत्रू तुझी वचने विसरले आहेत. तुझे वचन अगदी शुद्ध आहे; ते तुझ्या दासाला प्रिय आहे; मी क्षुद्र व तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही. तुझे न्याय्यत्व हे सनातन न्याय्यत्व आहे, आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे. संकट व क्लेश ह्यांनी मला घेरले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे. तुझे निर्बंध निरंतर न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन. मी अगदी मनापासून तुझा धावा करतो; हे परमेश्वरा, माझे ऐक; मी तुझे नियम पाळीन. मी तुझा धावा करतो; तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन. उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो; मी तुझ्या वचनांची आशा धरतो. तुझ्या वचनाचे चिंतन करायला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत; ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत. हे परमेश्वरा, तू जवळ आहेस; तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या निर्बंधांवरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 119
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 119:129-152
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ