YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:113-128

स्तोत्रसंहिता 119:113-128 MARVBSI

मी दुटप्पी मनुष्यांचा द्वेष करतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस; मी तुझ्या वचनाची आशा धरतो. अहो दुष्कर्म्यांनो, माझ्यापासून दूर व्हा म्हणजे मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन. तू आपल्या वचनानुसार मला सांभाळ, म्हणजे मी जगेन; माझ्या आशेसंबंधाने मला फजीत होऊ देऊ नकोस. मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन, आणि तुझ्या नियमांकडे निरंतर लक्ष ठेवीन. तुझ्या नियमांपासून बहकणार्‍या सर्वांचा तू धिक्कार करतोस; त्यांचे कपट निरर्थक आहे. पृथ्वीवरील सर्व दुर्जनांस तू गाळासारखे दूर करतोस; म्हणून तुझे निर्बंध मला प्रिय आहेत. तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो; तुझ्या निर्णयांना मी भितो. मी न्याय व नीती आचरली आहे; माझा छळ करणार्‍यांच्या हाती मला सोडून देऊ नकोस. तू आपल्या दासाच्या हितासाठी जामीन हो; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नकोस. तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतीक्षा करून करून माझे डोळे शिणले आहेत. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून आपल्या दासाला वागवून घे, आणि तू आपले नियम मला शिकव. मी तुझा दास आहे, मला तुझ्या निर्बंधांचे ज्ञान व्हावे म्हणून तू मला बुद्धी दे. परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे; ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. ह्यामुळे सर्व बाबीसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करतो.