YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 105

105
इस्राएलासाठी देवाने केलेले चमत्कार
(१ इति. 16:7-22)
1परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा.
2त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा.
3त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित होवो.
4परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा; त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा.
5त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.
6त्याचा सेवक अब्राहाम ह्याचे वंशजहो, त्याचे निवडलेले याकोबाचे वंशजहो, तुम्ही असे करा.
7तो परमेश्वर आमचा देव आहे; त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीभर आहेत.
8तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो;
9हा करार त्याने अब्राहामाशी केला आणि त्याविषयी इसहाकाजवळ शपथ वाहिली;
10ती त्याने याकोबासाठी नियम, इस्राएलासाठी सर्वकाळचा करार ह्या रूपाने कायम केली;
11तो म्हणाला, “कनान देश तुझा वतनभाग म्हणून मी तुला देईन.”
12त्या वेळी ते मोजके, फार थोडके होते, व तेही त्या देशात उपरे असे होते.
13ते राष्ट्राराष्ट्रांतून, एका राज्यातून दुसर्‍या लोकांत हिंडले.
14त्याने कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव करू दिला नाही, त्यांच्यासाठी त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की,
15“माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.”
16त्याने देशावर दुष्काळ आणला; त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला.
17त्यांच्यापुढे त्याने एक मनुष्य पाठवला; योसेफ दास म्हणून विकला गेला;
18त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली; त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकवले.
19त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले.
20राजाने माणसे पाठवून त्याला सोडवले; राष्ट्रांच्या अधिपतीने त्याला मुक्त केले.
21त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी, आपल्या सर्व संपत्तीवर अधिकारी नेमले,
22अशासाठी की, त्याने आपल्या मनाप्रमाणे त्याच्या सरदारांना शिकवावे आणि त्याच्या मंत्र्यांना शहाणपण सांगावे.
23नंतर इस्राएल मिसर देशात आला; याकोब हामाच्या देशात उपरा म्हणून राहिला.
24परमेश्वराने आपले लोक पुष्कळ वाढवले, त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना बलिष्ठ केले.
25आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा आणि आपल्या सेवकांशी कपटाने वागावे म्हणून त्याने त्यांच्या शत्रूंचे मन फिरवले.
26त्याने आपला सेवक मोशे व आपण निवडलेला अहरोन ह्यांना पाठवले.
27त्यांनी त्यांच्यामध्ये परमेश्वराची चिन्हे, हामाच्या देशात अद्भुत कृत्ये करून दाखवली.
28त्याने अंधकार पाठवून काळोख पाडला, आणि त्यांनी त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केले.1
29त्याने मिसर्‍यांच्या पाण्यांचे रक्त केले व त्यांतील मासे मारून टाकले.
30त्यांचा देश, त्यांचे राजवाडे बेडकांनी व्यापून टाकले.
31त्याने आज्ञा करताच गोमाश्या आल्या, त्यांच्या सर्व प्रदेशात उवा झाल्या.
32त्याने पावसाऐवजी त्यांच्यावर गारा पाडल्या; त्यांच्या देशावर अग्नीचे लोळ पाठवले.
33त्याने त्यांचे द्राक्षवेल व अंजीर ह्यांचा विध्वंस केला, त्यांच्या देशातील झाडे मोडून टाकली.
34त्याने आज्ञा करताच टोळ व असंख्य नाकतोडे आले.
35त्यांनी त्यांच्या देशातील सर्व हिरवळ खाल्ली, त्यांच्या भूमीचे उत्पन्न खाल्ले.
36त्याने त्यांच्या देशातील प्रत्येक प्रथमजन्मलेला म्हणजे त्यांच्या पौरुषांचे प्रथमफळ मारले.
37त्याने लोकांना सोन्यारुप्यासहित बाहेर नेले; त्याच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बल नव्हता.
38त्यांच्या जाण्याने मिसरी लोकांना आनंद झाला; कारण त्यांना त्यांचे भय पडले होते.
39त्यांच्यावर छत्र होण्यासाठी त्याने ढग पसरला, आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभ दिला.
40त्यांनी अन्न मागितले तेव्हा त्याने लावे पक्षी आणले, आणि स्वर्गीय अन्नाने त्यांना तृप्त केले.
41त्याने खडक फोडला तेव्हा पाणी निघाले; ते नदीप्रमाणे रुक्ष प्रदेशातून वाहू लागले.
42कारण त्याला आपल्या पवित्र वचनाची व आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती.
43त्याने आपल्या लोकांना आनंद करत, आपल्या निवडलेल्या लोकांना जयोत्सव करत बाहेर आणले.
44त्याने त्यांना परक्या राष्ट्रांचे देश दिले; त्या लोकांच्या श्रमाचे फळ ह्यांच्या हाती आले,
45ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम पाळावेत, आपल्या नियमशास्त्राप्रमाणे वागावे. परमेशाचे स्तवन करा!2

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 105: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन