शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हांला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे.
त्या कुत्र्यांविषयी सावध असा; त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा; केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा.
कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहोत.
तरी देहावरही भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसर्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार.
मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकांतला, बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रदृष्टीने परूशी;
आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.
तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे;
इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा,
आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व — माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे — तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे.
हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी;
म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे.
एवढ्यातच मी मिळवले, किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागतो आहे.
बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून,
ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम.
तर जेवढे आपण पोक्त आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली, तरी देव तीही तुम्हांला प्रकट करील.
तथापि, आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे एकचित्ताने पुढे चालावे.
बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकारी व्हा, आणि आम्ही तुम्हांला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.
कारण मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत.
नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.
आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत;
ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे नीचावस्थेतील शरीर स्वत:च्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.