YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 2:14-30

फिलिप्पैकरांस पत्र 2:14-30 MARVBSI

जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा; ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता; असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वत: अर्पण केला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो; आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा. तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्याला मी तुमच्याकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे. तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात; पण त्याचे शील तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे. म्हणून माझे काय होणार आहे हे समजताच त्याला रवाना करता येईल अशी मला आशा आहे. तरी प्रभूमध्ये मला भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर येईन. तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठवण्याचे अगत्य वाटले; कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत झाला होता; तो खरोखर मरणोन्मुख झाला होता; तथापि देवाने त्याच्यावर दया केली; ती केवळ त्याच्यावर नव्हे तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून, माझ्यावरही केली. म्हणून मी त्याला पाठवण्याची अधिक त्वरा केली; तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा, आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. ह्यावरून प्रभूच्या ठायी त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा; आणि अशांचा मान राखा; कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्तसेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.