YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 1:12-26

फिलिप्पैकरांस पत्र 1:12-26 MARVBSI

बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे; म्हणजे कैसराच्या हुजरातीच्या सर्व सैनिकांत व इतर सर्व जणांत, माझी बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली; आणि त्यांची खातरी पटून प्रभूमधील बहुतेक बंधू माझ्या बंधनांमुळे उत्तेजित होऊन देवाचे वचन निर्भयपणे सांगण्यास अधिक धीट झाले आहेत. कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात; आणि कित्येक सद्भावाने करतात. मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात; पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावीत अशा इच्छेने तट पाडण्याकरता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. ह्यापासून काय होते? निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते; आणि ह्यात मी आनंद करतो व करणारच. कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही, जगण्याने किंवा मरण्याने, माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे. मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार; आणि विश्वासात तुम्हांला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे; हे अशासाठी की, तुमच्याकडे माझे पुन्हा येणे झाल्याने, माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हांला अधिक कारण व्हावे.