YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 9:1-14

गणना 9:1-14 MARVBSI

इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसर्‍या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनाय रानात मोशेला म्हणाला, “नेमलेल्या समयी इस्राएल लोकांनी वल्हांडण सण पाळावा. ह्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी नेमलेल्या समयी त्याच्यासंबंधाचे सर्व विधी व सर्व नियम ह्यांना अनुसरून तुम्ही तो पाळावा.” मग मोशेने इस्राएल लोकांना वल्हांडण सण पाळायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी सीनाय रानात वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले. एका मनुष्याच्या प्रेतामुळे अशुद्ध झालेले काही पुरुष होते, त्यांना त्या दिवशी वल्हांडण सण पाळता येईना, म्हणून ते त्या दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्याकडे आले; ते मोशेला म्हणाले, “एका मनुष्याच्या प्रेतामुळे आम्ही अशुद्ध झालो आहोत तर इस्राएल लोकांबरोबर नेमलेल्या समयी परमेश्वराला अर्पण आणण्याची आम्हांला का मनाई असावी?” मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा; तुमच्याबाबत परमेश्वराची काय आज्ञा आहे ते मी ऐकतो.” परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग की, तुमच्यातला किंवा तुमच्या वंशजांतला कोणी प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला तरी त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळावा. दुसर्‍या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी त्यांनी सण पाळावा; त्यांनी बेखमीर भाकर आणि कडू भाजी ह्यांच्याबरोबर वल्हांडणाचा यज्ञपशू खावा; त्यांनी त्यातले काहीच सकाळपर्यंत ठेवू नये व त्याचे हाड मोडू नये; वल्हांडणाच्या सर्व विधीप्रमाणे त्यांनी हा सण पाळावा. परंतु एखादा मनुष्य शुद्ध असून व प्रवासात नसूनही त्याने वल्हांडण सण पाळण्याची हयगय केली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. नेमलेल्या समयी त्याने परमेश्वराला अर्पण आणले नाही म्हणून त्याच्या पापाची शिक्षा त्याने भोगावी. तुमच्यामध्ये राहणार्‍या कोणा परदेशीयाला परमेश्वरा-प्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळायची इच्छा असली तर त्याने ह्या सणाचे विधी व नियम ह्यांना अनुसरून तो पाळावा. स्वदेशीय व परदेशीय ह्या दोघांनाही एकच नियम असावा.”