YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 36

36
वारसा हक्क असणार्‍या मुलींच्या लग्नांसंबंधी नियम
1मग योसेफ वंशाच्या कुळांपैकी गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याच्या वंशातील पितृकुळाचे प्रमुख पुरुष मोशेकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांच्या पितृकुळांच्या सरदारांना म्हणाले, 2“परमेश्वराने आमच्या स्वामीला आज्ञा केली होती की, इस्राएल लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून वाटून द्यावा; परमेश्वराने आमच्या स्वामीला आणखी अशी आज्ञा केली होती की, आमचा बंधू सलाफहाद ह्याच्या वतनाचा हिस्सा त्याच्या मुलींना द्यावा.
3पण इस्राएल लोकांच्या इतर कोणत्याही वंशातल्या पुरुषांशी त्याचा विवाह झाला तर आमच्या वाडवडिलांच्या वतनातून त्यांचा हिस्सा कमी होईल आणि ज्या वंशात त्या जातील त्या वंशाच्या वतनात तो मिळवला जाईल, आणि आमच्या हिश्शाच्या वतनातून तो कमी होईल.
4मग इस्राएल लोकांचे योबेलवर्ष आल्यावरही ज्या वंशात त्या गेल्या असतील त्याच्या वतनात तो मिळवला जाईल; अशाने त्यांचे वतन आमच्या वाडवडिलांच्या वंशाच्या वतनातून कमी होईल.”
5तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांना आज्ञा केली की, “योसेफाचे वंशज म्हणतात ते बरोबर आहे.
6सलाफहादाच्या मुलींसंबंधाने परमेश्वराने अशी आज्ञा केली आहे की, ‘त्यांना आवडेल त्याच्याशी त्यांनी विवाह करावा, पण आपल्या बापाच्या वंशाच्या कुळातच त्यांनी विवाह करावा.’
7इस्राएल लोकांचे वतन एका वंशातून दुसर्‍या वंशात जाऊ नये; इस्राएल लोकांतील प्रत्येकाने आपल्या बापाच्या वंशाच्या वतनाला चिकटून राहावे.
8इस्राएल लोकांच्या कोणत्याही वंशातील कोणत्याही मुलीला वतन मिळालेले असेल तर तिचा विवाह तिच्या बापाच्या वंशाच्या कुळातल्या मुलाशीच व्हावा; अशाने इस्राएल लोकांतील प्रत्येकाला आपल्या वाडवडिलांचे वतन मिळेल.
9कोणतेही वतन एका वंशातून दुसर्‍या वंशात जाऊ नये; इस्राएल लोकांच्या प्रत्येक वंशाने आपल्याच वतनाला चिकटून राहावे.”
10परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सलाफहादाच्या मुलींनी केले;
11सलाफहादाच्या मुली महला, तिरसा, होग्ला, मिल्का व नोआ ह्यांनी आपल्या चुलत भावांशी विवाह केला.
12योसेफपुत्र मनश्शे ह्याच्या वंशातल्या कुळातच त्यांचा विवाह झाला म्हणून त्यांचे वतन त्यांच्या बापाच्या कुळाच्या वंशात कायम राहिले.
13मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशेच्या द्वारे परमेश्वराने जे नियम व विधी इस्राएल लोकांना लावून दिले ते हे होत.

सध्या निवडलेले:

गणना 36: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन