YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 9:2-13

मार्क 9:2-13 MARVBSI

मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपान्तर झाले. आणि त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरीशुभ्र झाली की तितकी पांढरीशुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परिटाला शक्य नाही. तेव्हा मोशेसह एलीया त्यांच्या दृष्टीस पडला; ते येशूबरोबर संभाषण करत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, “गुरूजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे; तर आम्ही तीन मंडप बनवू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” काय बोलावे हे त्याला सुचले नाही; कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.”’ मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले तेव्हा येशूशिवाय त्यांना आपल्याजवळ आणखी कोणी दिसले नाही. नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, ‘तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका.’ हे बोलणे मनात ठेवून मृतांमधून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याविषयी ते एकमेकांना विचारू लागले. मग त्यांनी त्याला विचारले, “पहिल्याने एलीया आला पाहिजे, असे शास्त्री म्हणतात ते कसे?” त्याने त्यांना उत्तर दिले, “एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही यथास्थित करतो हे खरे आहे; तर मग मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी व तुच्छ मानले जावे असे त्याच्याविषयी लिहिले आहे त्याचा अर्थ काय? तथापि मी तुम्हांला सांगतो, एलीया तर आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले.”