YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 8:27-36

मार्क 8:27-36 MARVBSI

नंतर येशू व त्याचे शिष्य फिलिप्पाच्या कैसरियाच्या आसपासच्या खेड्यापाड्यांत जाण्यास निघाले; तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; कित्येक एलीया; कित्येक संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात.” तेव्हा त्याने त्यांना विचारले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने त्याला उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात.” तेव्हा ‘माझ्याविषयी कोणाला सांगू नका’ अशी त्याने त्यांना ताकीद दिली. तो त्यांना असे शिक्षण देऊ लागला की, ‘मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि त्याने तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.’ ही गोष्ट तो उघड बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याला दटावू लागला. तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व तो पेत्राला दटावून म्हणाला, “सैताना, माझ्यापुढून चालता हो; कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्यांचा आहे.” मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता व सुवार्तेकरता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ?