तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व जण माझे ऐका व समजून घ्या;
बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही; तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते.
ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले.
तो त्यांना म्हणाला, “तुम्हीदेखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हांला समजत नाही काय?
कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व शौचकूपात बाहेर पडते.” अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले.
आणखी तो म्हणाला, “जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते.
कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात;
जारकर्मे, चोर्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा.
ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात.”
मग तो तेथून निघून सोर व सीदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते.
पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली.
ती बाई हेल्लेणी असून सुरफुनीकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की, “माझ्या मुलीतून भूत काढा.”
तो तिला म्हणाला, “मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.”
मग तिने त्याला उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात.”
तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”
मग ती आपल्या घरी गेली, तेव्हा मुलीला अंथरूणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले.
नंतर तो सोर प्रांतातून निघाला आणि सीदोनावरून दकापलीस प्रांतामधून गालील समुद्राकडे परत आला.
तेव्हा लोकांनी एका बहिर्या-तोतर्या माणसाला त्याच्याकडे आणून, ‘आपण ह्याच्यावर हात ठेवा’ अशी त्याला विनंती केली.
तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानांत बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला;
आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, “इप्फाथा,” म्हणजे “मोकळा हो.”
तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद लगेच सुटून तो स्पष्ट बोलू लागला.
तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले; परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला तसतसे ते अधिकच हे जाहीर करीत गेले.
आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे; हा बहिर्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो.”