तेव्हा परूशी व यरुशलेमेहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवत नाहीत; बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत; आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे व असल्या बर्याच दुसर्या रूढी ते पाळतात. ह्यावरून परूश्यांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत?” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा : ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात, ते असतात मनुष्यांचे नियम.’ तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. [म्हणजे घागरी व प्याले धुणे व ह्यांसारखीच इतर अनेक कामे करता.]” आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे! कारण मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख’ आणि ‘जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ परंतु तुम्ही म्हणता जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, ‘जे मी तुम्हांला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे,’ तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही; अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता.”
मार्क 7 वाचा
ऐका मार्क 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 7:1-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ