नंतर तो तेथून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्यामागे आले.
मग शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले, “ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात!
जो सुतार, जो मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन ह्यांचा जो भाऊ तोच हा आहे ना? आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?” असे ते त्याच्याविषयी अडखळले.
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो.”
त्याने थोड्याच रोग्यांवर हात ठेवून त्यांना बरे केले, ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही.
त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. मग तो शिक्षण देत गावोगाव फिरला.
नंतर त्या बारा जणांना आपल्या जवळ बोलावून तो त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला; त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला.
आणि त्यांना आज्ञा केली की, ‘वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका; भाकरी, झोळणा, किंवा कमरकशात पैसे घेऊ नका.
तरी वहाणा घालून चाला; दोन अंगरखे घालू नका.’
आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच राहा.
आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही व जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका. [मी तुम्हांला खचीत सांगतो की, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्यांना सोपे जाईल].”
ते तेथून निघाले व लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली,
पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून बरे केले.
हेरोद राजाने त्याच्याविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत.”
कोणी म्हणत, “हा एलीया आहे.” कोणी म्हणत, “हा संदेष्टा म्हणजे संदेष्ट्यांपैकीच एक आहे.”
परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच मेलेल्यांतून उठला आहे.”
आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदाने स्वतः माणसे पाठवून योहानाला पकडून कैदेत जखडून ठेवले होते; कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते,
व योहान त्याला म्हणत असे, “तू आपल्या भावाची बायको ठेवावीस हे सशास्त्र नाही.”
ह्याकरता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना;
कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई.
नंतर एक सोईचा दिवस आला. तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार व गालीलातील प्रमुख लोक ह्यांना मेजवानी दिली.
आणि हेरोदियेच्या मुलीने स्वतः आत जाऊन व नाच करून हेरोदाला व त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांना खूश केले. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन.”
तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.”
तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शीर!”
तेव्हा लगेचच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, “माझी इच्छा अशी आहे की, बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शीर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे.”
तेव्हा राजा फारच खिन्न झाला; तथापि वाहिलेल्या शपथांमुळे व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याला तिला नाही म्हणावेसे वाटले नाही.
राजाने लगेच आपल्या पहार्यातील एका शिपायाला पाठवून योहानाचे शीर आणण्याची आज्ञा केली; त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला,
आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले.
हे ऐकल्यावर त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले.
ह्यानंतर प्रेषित येशूजवळ जमा झाले व आपण जे जे केले व जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले.
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही रानात एकान्तात चला व थोडा विसावा घ्या;” कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवण्यासदेखील सवड होईना.
तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकान्तात गेले.