YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 4:1-20

मार्क 4:1-20 MARVBSI

पुन्हा तो समुद्रकिनार्‍यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला; म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला; आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते. नंतर तो त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला, “ऐका; पाहा, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला. आणि तो पेरत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती; माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले; आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले; व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.” मग तो म्हणाला, “ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.” तो एकान्तात असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्यांविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हांलाच दिले आहे; परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते; ह्यासाठी की, त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये.” तो त्यांना म्हणाला, “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय? तर मग सर्व दाखले कसे समजतील? पेरणारा वचन पेरतो. वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात, व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून ते स्वीकारतात; मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.”

मार्क 4:1-20 साठी चलचित्र