YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 3:20-35

मार्क 3:20-35 MARVBSI

मग तो घरी आला; तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवायलाही सवड होईना. हे ऐकून त्याचे आप्त त्याला धरायला निघाले; कारण “त्याला वेड लागले आहे” असे त्यांचे म्हणणे होते. तसेच यरुशलेमेहून आलेले शास्त्री म्हणत होते की, “त्याला बालजबूल लागला आहे व तो त्या भुतांच्या अधिकार्‍याच्या साहाय्याने भुते काढतो.” तेव्हा तो त्यांना आपणाजवळ बोलावून म्हणू लागला की, “सैतान सैतानाला कसा काढील? आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही. आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही. सैतान स्वतःवरच उठला व त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार. बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही; त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. मी तुम्हांला खचीत सांगतो की, मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे.” “त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे,” असे ते म्हणत होते म्हणून तो हे बोलला. तेव्हा त्याची आई व त्याचे भाऊ आले, आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले. त्याच्याभोवती पुष्कळ लोक बसले होते; ते त्याला म्हणाले, “पाहा, बाहेर आपली आई व आपले भाऊ आपला शोध करीत आहेत.” त्याने त्यांना उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?” मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “पाहा, ही माझी आई व हे माझे भाऊ! जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई.”