YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 16:1-11

मार्क 16:1-11 MARVBSI

नंतर शब्बाथ गेल्यावर मग्दालीया मरीया, याकोबाची आई मरीया व सलोमे ह्यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंधद्रव्ये विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकींना म्हणत होत्या, “आपल्याकरता कबरेच्या तोंडावरून धोंड कोण लोटील?” त्यांनी वर पाहिले तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले; ती तर फारच मोठी होती. मग कबरेच्या आत त्या गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, “चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही; त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा. तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल.” मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या; कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या; त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. [आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रात:काळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्याप्रथम मग्दालीया मरीया हिला दर्शन दिले; हिच्याचमधून त्याने सात भुते काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही.