YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 16

16
येशूचे पुनरुत्थान
1नंतर शब्बाथ गेल्यावर मग्दालीया मरीया, याकोबाची आई मरीया व सलोमे ह्यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंधद्रव्ये विकत घेतली.
2आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या.
3तेव्हा त्या एकमेकींना म्हणत होत्या, “आपल्याकरता कबरेच्या तोंडावरून धोंड कोण लोटील?”
4त्यांनी वर पाहिले तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले; ती तर फारच मोठी होती.
5मग कबरेच्या आत त्या गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या.
6तो त्यांना म्हणाला, “चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही; त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा.
7तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल.”
8मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या; कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या; त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या.
शिष्यांना येशूचे दर्शन
9[आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रात:काळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्याप्रथम मग्दालीया मरीया हिला दर्शन दिले; हिच्याचमधून त्याने सात भुते काढली होती.
10तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करत व रडत असलेल्या लोकांना सांगितले.
11आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही.
12ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण बाहेरगावी चालले असता त्यांना तो दुसर्‍या रूपाने प्रकट झाला.
13त्यांनी जाऊन इतरांना सांगितले तरी त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही.
14नंतर अकरा जण जेवायला बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला; आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंत:करणाचा कठीणपणा ह्यांविषयी त्यांना दोष लावला.
येशूची अखेरची आज्ञा
15मग त्याने त्यांना सांगितले की, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.
16जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल.
17आणि विश्वास धरणार्‍यांबरोबर ही चिन्हे असत जातील : ते माझ्या नावाने भुते काढतील, नवनव्या भाषा बोलतील,
18सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाइतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”
प्रभू येशूचे स्वर्गारोहण व शिष्यांची कामगिरी
19ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला.
20त्यानंतर त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणार्‍या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करत होता.]

सध्या निवडलेले:

मार्क 16: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन