YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 14:1-25

मार्क 14:1-25 MARVBSI

मग दोन दिवसांनंतर ‘वल्हांडण व बेखमीर भाकरी’चा सण होता आणि त्याला कपटाने कसे धरावे व जिवे मारावे हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते; कारण ते म्हणत होते, “आपण हे सणात करू नये, केले तर कदाचित लोकांत दंगल होईल.” तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी जेवायला बसला असता कोणीएक स्त्री जटामांसीच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली; तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली. तेव्हा कित्येक जण आपसांत चडफडून म्हणाले, “ह्या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली?” कारण “हे सुगंधी तेल तीनशेपेक्षा अधिक रुपयांना विकून ते गोरगरिबांना देता आले असते.” अशी ते तिच्याविषयी कुरकुर करत होते. परंतु येशू म्हणाला, “हिच्या वाटेस जाऊ नका, हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हांला त्यांचे बरे करता येते; परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच आहे असे नाही. हिला जे काही करता आले ते हिने केले आहे. हिने उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधद्रव्य लावले आहे. मी तुम्हांला खचीत सांगतो की, सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल.” नंतर त्या बारा जणांपैकी एक म्हणजे यहूदा इस्कर्योत हा त्याला मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या विचाराने त्यांच्याकडे निघून गेला. त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला पैसे देऊ केले; तेव्हा तो त्याला धरून देण्याची सोईस्कर संधी पाहू लागला. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारत असत; त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?” मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, “नगरात जा, म्हणजे कोणीएक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हांला भेटेल; त्याच्यामागून जा. तो आत जाईल तेथल्या घरधन्याला असे सांगा : ‘गुरूजी विचारतात मी आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरण्याची जागा कोठे आहे?’ मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हांला दाखवील; तेथे आपल्यासाठी तयारी करा.” मग शिष्य निघून गेले, तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली. मग संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर आला. आणि ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल, तो माझ्याबरोबर जेवणारा आहे.” ते खिन्न होऊ लागले व एकामागून एक त्याला विचारू लागले, “मी आहे काय तो?” तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर ताटात हात घालत आहे तोच. मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी शास्त्रात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे जातो खरा; परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.” ते भोजन करत असता येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझे शरीर आहे.” आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून त्यांना तो दिला; आणि ते सर्व जण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, “हे ‘[नवीन] करार’ प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले जात आहे. मी तुम्हांला खचीत सांगतो की, मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही.”