YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मीखा 7:1-20

मीखा 7:1-20 MARVBSI

कोण ही माझी विपत्ती! उन्हाळ्यातील फळे काढून घेतल्यावर जशी झाडावर काही राहतात, द्राक्षीच्या वेलीवर जसा सरवा राहतो, तसा मी झालो आहे; खायला द्राक्षांचा एक घोसही राहिला नाही; माझ्या जिवाला आवडेल असा पहिल्या बाराचा अंजीर राहिला नाही. भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे; माणसांत कोणी सरळ उरला नाही; ते सर्व रक्तपात करण्यास टपले आहेत, प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करतो. दुष्कर्म जोमाने करावे म्हणून ते आपले दोन्ही हात चालवतात; सरदार फर्मावतो ते न्यायाधीश लाच घेऊन करतो; वेडा मनुष्य आपल्या मनातील दुष्ट भाव बोलून दाखवतो; असे ते सर्व मिळून दुष्टतेचे जाळे विणतात. त्यांच्यातला जो उत्तम तो काटेरी झुडपासारखा आहे; त्यांच्यातला जो सरळ तो काटेरी कुंपणाहून वाईट आहे; तुझ्या टेहळणी करणार्‍यांनी टेहळलेला दिवस, तुझी झडती घेण्याचा दिवस येत आहे; आता त्यांची त्रेधा उडेल. सोबत्याचा भरवसा धरू नकोस, जिवलग मित्रावर अवलंबून राहू नकोस, तुझ्या उराजवळ निजणार्‍या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर. कारण पुत्र बापाला तुच्छ मानत आहे, मुलगी आपल्या आईवर उठली आहे, सून आपल्या सासूवर उठली आहे; मनुष्याच्या घरचे इसम त्याचे वैरी झाले आहेत. मी तर परमेश्वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणार्‍या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल. अगे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नकोस; मी पडले, तरी पुन्हा उठेन; मी अंधारात बसले, तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करील, तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन; कारण मी त्याच्याविरुद्ध पाप केले आहे; मला तो प्रकाशात नेईल, मी त्याचे न्यायीपण पाहीन. जी मला म्हणाली होती की, “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” ती माझी वैरीण ते पाहील व ती लज्जेने व्याप्त होईल; माझे डोळे तिला पाहतील, तिला रस्त्यांतल्या चिखलासारखे तुडवतील. तुझे तट बांधण्याचा समय आला आहे. त्या दिवशी तुझ्या सीमा रुंद होतील. त्या दिवशी अश्शूर देशातून, मिसर देशातील नगरांतून, मिसर देशापासून फरात नदीपर्यंतच्या प्रांतांतून, दूरदूरच्या समुद्रतीरांहून व दूरदूरच्या पर्वतांवरून लोक तुझ्याकडे येतील. तथापि देश, आपल्या रहिवाशांमुळे, त्यांच्या कृत्यांच्या फळामुळे वैराण होईल. तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार; तुझ्या वतनातील मेंढरे कर्मेलाच्या झाडीत एकान्ती राहतात त्यांना चार; प्राचीन काळच्या दिवसांप्रमाणे बाशानात व गिलादात त्यांना चरू दे. तू मिसर देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन. राष्ट्रे हे पाहतील व आपले एकंदर बल पाहून लज्जित होतील, ती आपल्या तोंडावर हात ठेवतील, त्यांचे कान बहिरे होतील. ती सर्पाप्रमाणे धूळ चाटतील, पृथ्वीवरील सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे ती आपल्या विवरांतून थरथर कापत बाहेर येतील, परमेश्वर आमचा देव ह्याच्याकडे ती भयकंपित होऊन येतील; ती तुझ्यापुढे भयभीत होतील. तुझ्यासमान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस; तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो वळून पुन्हा आमच्यावर दया करील; आमचे अपराध पायांखाली तुडवील; तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सत्यतेने व अब्राहामाबरोबर वात्सल्याने वर्तशील.