YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 9:9-17

मत्तय 9:9-17 MARVBSI

मग तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला. नंतर असे झाले की, तो घरात बसला असता, पाहा, बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले. हे पाहून परूशी त्याच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?” हे ऐकून तो म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाइतांना आहे. ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’ ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका; कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना पश्‍चात्तापासाठी बोलावण्यास मी आलो आहे.” त्या वेळेस योहानाचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपास करतो, पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्याचे कारण काय?” येशू त्यांना म्हणाला, “वर्‍हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपास करतील. कोणी कोर्‍या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाहीत; कारण धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते. तसेच कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालत नाहीत; घातला तर बुधले फुटून द्राक्षारस सांडतो आणि बुधले बिघडतात; तर नवा द्राक्षारस नव्या बुधल्यात घालतात म्हणजे दोन्ही नीट राहतात.”